Monday 4 November 2013

॥ सर्वसारोपनिषत् ॥

॥ सर्वसारोपनिषत् ॥

समस्तवेदान्तसारसिद्धान्तार्थकलेवरम् ।
विकलेवरकैवल्यं रामचन्द्रपदं भजे ॥
सर्वसारं निरालम्बं रहस्यं वज्रसूचिकम् ।
तेजोनादध्यानविद्यायोगतत्त्वात्मबोधकम् ॥

ॐ सह नाववतु ॥ सह नौ भुनक्तु ॥ सह वीर्यं करवावहै ॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

कथं बन्धः कथं मोक्षः का विद्या काऽविद्येति । जाग्रत् स्वप्नसुषुप्ति तुरीयं च कथम् । 
अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय् आनन्दमयकोशाः कथम् । 
कर्ता जीवः पञ्चवर्गः क्षेत्रज्ञः साक्षी कूटस्थः अन्तर्यामी कथम् । 
प्रत्यगात्मा परात्मा माया चेति कथम् ? ॥ १ ॥

बंधन म्हणजे काय ? मुक्ति म्हणजे काय ? विद्या कशाला म्हणतात ? आणि अविद्या कशाला म्हणतात ? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीया ह्या चार अवस्था म्हणजे काय आणि कशाच्या ? अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश यांची ओळख कशी करून घ्यायची . कर्ता, जीव, पंचवर्ग, क्षेत्रज्ञ, साक्षी, कूटस्थ आणि अंतर्यामी हे सर्व म्हणजे काय आहे ? प्रत्यगात्मा म्हणजे काय ? कशाला परमात्मा म्हणायचे आणि कशाला माया म्हणायचे ?

आत्मा ईश्वर जीवः अनात्मनां देहादीनाम् आत्मत्वेन अभिमन्यते सोऽभिमान आत्मनो बन्धः । तन्निवृत्तिर्मोक्षः ॥ २ ॥

आत्माच ईश्वररूप आहे आणि तोच जीवरूपही आहे . चेतनरूपी जीव कोणत्याही शरीरयोनींत असतां जोपर्यंत अहंभाव स्पर्शरहित असतो, तोंवर तोही सर्वव्यापी ईश्वरच असतो. पण त्याचा शरीराशी तादात्म्य पावून अहंभाव - म्हणजे 'मी' वेगळा आणि हे दृश्यमान 'जगत्' निराळे असा भाव - निर्माण झाला कीं त्याला अनात्म व्याधी लागली असे जाणायचें . हेंच बंधन होय. ईश्वराचा अंश असलेल्या जीवात्म्याचे शरीराशी तादात्म्य झाल्यामुळें उत्पन्न होणाऱ्या अहंभावापासून मुक्ती होणें [ अर्थात् अहंभाव नाहींसा होणें ] ह्यालाच मोक्ष म्हणायचे. मोक्ष 'प्राप्त' होत नसतो. सदा मुक्त असूनही कल्पित अज्ञानाने बंधनात पडलेल्याला मोक्षाच्या स्वरूपाची अनुभूति होते एव्हढेंच. Alas ! It is not that simple !

या तद् अभिमानं कारयति सा अविद्या । 
सोऽभिमानो यया निवर्तते सा विद्या ॥ ३ ॥

स्वसान्निध्य असलेल्या पण त्याची जाण नसलेल्या [माया शक्तीच्या प्रभावामुळे] अंशात्मक जीवात्म्यामध्ये अहंभाव - मीपणाचा अभिमान - उत्पन्न करणारी शक्ति ती अविद्या [ ' विद्या अहं अविद्या अहं '- देवी. उप.] . आणि ज्याकारणामुळे हा अहंरूपी अभिमान गळून जातो त्याला विद्या म्हणतात. ( ह्याचेंच दुसरे नांव म्हणजे 'ज्ञान' )
पुढील मंत्रात शरीर-तादात्म्य पावलेल्या जीवात्म्याच्या अवस्थांचे वर्णन ...

मनआदि चतुर्दशकरणैः पुष्कलैः आदित्याद्यनुगृहीतैः शब्दादीन्विषयान् स्थूलान् यद् उपलभते तद् आत्मनो जागरणम् । तद् वासनासहितैः चतुर्दशकरणैः शब्दादि अभावेऽपि वासनामयाञ् छब्दादीन्यदोपलभते तद् आत्मनः स्वप्नम् । चतुर्दशकरणा उपरमाद् विशेषविज्ञानाभावाद् यदा शब्दादीन्नोपलभते तदात्मनः सुषुप्तम् । अवस्थात्रय भावाभावसाक्षी स्वयंभावरहितं नैरन्तर्यं चैतन्यं यदा तदा तुरीयं चैतन्यमित्युच्यते ॥ ४ ॥

पंचमहाभूत व पांच ज्ञानेंद्रियें यांना देव म्हटले आहे. ( प्र.उ. २.२ ) ह्या देवांनी अनुग्रहीत केलेल्या अंतःकरणचतुष्टय, पंचज्ञानेंद्रियें, व पंच कर्मेंद्रियें ह्या चवदा 'करणां'च्या द्वारे ज्या अवस्थेमध्ये जीवात्मा पंचविषयांचे ( शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध ) प्रत्यक्ष ग्रहण करतो - म्हणजेच ते ते विषय अनुभवतो - त्या अवस्थेला जाग्रत अवस्था म्हणतात. हें विषयग्रहण स्वरूपाहून भिन्न अशा फक्त बाह्यविषयांचे असते ( 'जागरितस्थानो बहिष्प्रज्ञ' मां. उप.) हे अनुभव बहुधा व्यक्तीच्या ( जीवात्म्याच्या ) आसपास, किंवा विषय ग्रहण करणाऱ्या इंद्रियांच्या मर्यादित कार्यक्षेत्राच्या वर्तुळांतील असतात. जाग्रत अवस्थेंत विषयांच्या अनुषंगानें आलेल्या अनुभवांची स्मृति वासनारूपानें मनुष्याच्या शरीरांत ( मस्तकांत ) पडसाद रूपानें नोंदणी झालेली असतें ह्या संचितरूपी वासनांचा मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यांत त्याच्या कार्यकुशलतेवर भयंकर प्रभाव असतो. ' स्वमायया कल्पित जीवलोके ' ( कैवल्य. उप.) प्रमाणे निद्रासमयी प्रत्यक्ष विषयांचा अभाव असतांनादेखील ज्या अवस्थेंत संचित वासनांच्या प्रभावाने युक्त होऊन मन आदि चवदा करणांद्वारे पंचविषयांचा अंतःप्रज्ञ होऊन अनुभव घेतो, त्या अवस्थेला स्वप्नावस्था म्हणतात. ही अवस्था बहुधा डोळे मिटलेल्या विश्रांतीसमयी असली तरी क्वचित डोळे उघडे असतांनाही 'दिवास्वप्ने' पडत असतांनाही अनुभवास येते. पण तेव्हांही तो स्वप्नांत अनुभवत असलेले विषय ( दृश्य ) असपास घडत असलेल्या विषयदृष्यांहून एकदम निराळे असतात. सर्व इंद्रियें जेव्हां शांत झालेली असतात आणि त्यामुळे ती कोणताही विषय अनुभवत नसतात, मन वा बुद्धींत देखील कशाचेंही स्फुरण नसते, आणि इतर कशाचेही विशेष ज्ञान नसते त्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात. वरील तिन्ही अवस्थांची उत्पत्ती, स्थिति व लय म्हणजेच स्थित्यंतर घडत असतांना त्या अवस्थांचा ज्ञाता हा जेव्हा साक्षीरूपानें तें स्थित्यंतर तटस्थपणें अनुभवतो, तो नित्य साक्षी ज्ञाता म्हणजेच तुरीय चैतन्य , आणि त्याची नित्य साक्षी भावाने राहाणारी नित्य अवस्था म्हणजे तुरीयावस्था.

अन्नकार्याणां कोशानां समूहो अन्नमयः कोश इत्युच्यते । प्राणादि चतुर्दशवायुभेदा अन्नमयकोशे यदा वर्तन्ते तदा प्राणमयः कोश इत्युच्यते । एतत् कोशद्वय संसक्तं मनादि चतुर्दशकरणैः आत्मा शब्दादि विषय सङ्कल्पादीन्धर्मान् यदा करोति तदा मनोमयः कोश इत्युच्यते । एतत् कोशत्रय संसक्तं तद्गत विशेषज्ञो यदा भासते तदा विज्ञानमयः कोश इत्युच्यते । एतत् कोशचतुष्टयं संसक्तं स्वकारणाज्ञाने वटकणिकायाम् इव वृक्षो यदा वर्तते तद् आनन्दमयः कोश इत्युच्यते ॥ ५ ॥

अन्नात् भवन्ति भूतानि ( भ. गी ५.३ ) - अन्नापासून भूतमात्र, म्हणजे प्राणीमात्रांची शरीरें होतात. अन्नापासून उत्पन्न व स्थिति असलेल्या हा स्थूल शरीरांत पांच घटक असतात. चर्म, मांस, स्नायु, अस्थि व मज्जा (तै. उप. १.७ ). ह्याला धातुपांक्त म्हटले आहे. पित्याने पचविलेल्या अन्नापासून शुक्ररूपाने निर्मित गर्भ, मातेच्या उदरांत तिने सेवन केलेल्या अन्नापासून त्या गर्भाचा जन्म आणि वाढ, आणि जन्मानंतर अन्न सेवनामुळें धातुपांक्ताचे अर्थात् शरीराचे होणारे पोषण व स्थिति. सर्व कांही अन्नमय म्हणून ह्या स्थूल शरीराला म्हणतात अन्नकोश. सर्व अधिष्ठानरूपी ह्या स्थूल शरीराबाहेर प्राणीमात्राचे अस्तित्व नसते. हें स्थूल शरीरच पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये यांचे अधिष्ठान असतें.
शरीरांतील चेतनता व कार्यशक्ति आपण श्वासाद्वारे घेतलेल्या प्राणवायुमुळे शक्य होते. हा वायु पंच-प्राणामध्ये विभागलेला आहे. ते आहेत प्राण, अपान, व्यान, उदान व समान. ह्या प्रत्येकाचा एक एक उपप्राण असें एकूण दहा प्राण ह्या शरीरांत कार्यरत असतांत ( ह्यांची शरीरांतील स्थानें आणि त्यांचे कार्य यांची माहिती प्र. उप. २ व ३ तसेच योगचूडा उप. मध्ये पहावी ). ह्या प्राणवायुने व्यापलेल्या शरीराला प्राणमय कोश म्हणतात. ह्या प्राणमय कोशाचे अन्नमय कोशावर नियंत्रण असतें.
अन्नमय व प्राणमय कोशात मागें सांगितल्याप्रमाणे चवदा करणांच्या साह्याने जीवात्मा जेव्हां बाह्य विषयांचे चिंतन करतो - चक्षूने रूप, जीभेने स्वाद वगैरे - तेव्हां त्याला मनोमय कोश म्हणतात. ज्ञानेंद्रियांपासून होत असलेले बाह्य जगांतील ज्ञान एके ठिकाणी संग्रहीत होते आणि त्या ठिकाणी एक ढोबळ निर्णय घेतला जातो व कर्मेंद्रियांना कृतीचा आदेश दिला जातो. तें ठिकाण म्हणजे मन. ह्याचे शरीरातील नेमके ठिकाण नसून ते शरीरभर व्याप्त असते, आणि अशा प्रकारे व्याप्त शरीराला मनोमय कोश म्हणतात. ह्याचे आधीच्या दोन्ही कोशावर नियंत्रण असते. उदा. - जर वाऱ्याने नुसते दार जोरात हापटले गेले तर मनोमय कोशावरील परिणाम म्हणून मन क्षणभर स्तब्ध होते, मनोमय कोशाचा प्राणमय शरीरावर परिणाम स्वरूप किंचित काल श्वास थांबतो आणि ह्याच्या परिणामस्वरूप अन्नमय कोशरूपी शरीरही क्षणभर स्तब्ध होते. मन इंद्रियाचे दोन मुख्य गुणधर्म म्हणजे सतत विचार प्रवाहांत राहाणें आणि 'हें' कां 'तें' अशा संशय रूपाने सतत दोलायमान असणें.
तिन्ही कोशांच्या संयुक्त साह्याने जीवात्मा जेव्हां एका विशिष्ट पद्धतीनें चिंतन करतों तें त्याचे विज्ञानमय शरीर म्हणजेच विज्ञानमय कोश. ह्या कोशांत मनुष्याच्या सर्व प्रकारच्या आठवणींची, अनुभवांची नोंदणी केलेली असते. कल्पनांचा उद्‍भव, परखणें , विवेक, समजूतदारपणा, निर्णय हें सर्व विज्ञानमय कोशांत घडते. विज्ञानमय कोशानें ताबा घेतला कीं मनाची दोलायमान स्थिती नाहींशी झाली समजा. पण बुद्धीनें निर्णय झाला तरी भावनेने झपाटलेले मन बुद्धीचा निर्णय धुडकावून लावल्याचेंही दिसतेंच. शास्त्रदृष्ट्या दोन्ही स्वतंत्र शरीरकोश असलें तरी त्यांच्यातला भेद अगदी सूक्ष्म भासतो divided by a very thin line
चारही कोशांनी युक्त जीवात्मा, जसें वटवृक्षाला त्याचें मूळ कारण त्याचे बीज आहे हें माहीत नसते तदवत्, अहंभाव युक्त शरीरांत आपले कारण-स्वरूपाच्या अज्ञानासहीत स्वस्थपणें बागडत असतो. त्या बीजरूपी शरीरकोशाला आनंदममय कोश म्हणतात. पंचकोशातील हा सर्वांत सूक्ष्म कोश. ह्याचा अनुभव मिळतो तो गाढ निद्रेत वा अगदी किंचित् काळ सुखनिद्रेंतून जागे झालेल्या शरीर अवस्थेत, पण इतर चार कोशांनी शरीराचा ताबा घ्यायच्या आधी. मग व्यक्ती कुठल्याही स्थरांतील असू दे - गरीब , श्रीमंत, हिन्दु, मुसलमान, संत, नीच - सर्वांची आनंदमय कोशातील स्थिती सारखीच असते.
इथें हें लक्षात घेणे आवश्यक आहे कीं हें सर्व कोश एकावर एक वा एकाच्या आंत एक असें नसून तें एकमेकांत पूर्णपणें मिसळलेले असतात. जसे बुंदीचे लाडू तूप, साखर इ. पदार्थांनी मिळून बनलेले असले तरी त्याची गोडी ही त्यांतील प्रत्येक घटकाच्या गोडीहून निराळी. आणखी एक विशेष म्हणजे प्रत्येक वरचढ कोशाचा त्याच्या खालील इतर सर्व कोशावर असलेला प्रभाव आणि नियंत्रण.

सुखदुःखबुद्ध्या श्रेयोऽन्तः कर्ता यदा तदा इष्टविषये बुद्धिः सुखबुद्धिः अनिष्टविषये बुद्धिर्दुःखबुद्धिः । शब्द स्पर्श रूप रस गन्धाः सुखदुःखहेतवः । पुण्यपाप कर्मानुसारी भूत्वा प्राप्त शरीरसंयोगम् अप्राप्तशरीरसंयोगम् इव कुर्वाणो यदा दृश्यते तदोपहितजीव इत्युच्यते ॥ ६ ॥

अंतःकर्ता म्हणजे मन. ह्याला इष्ट विषय - दृष्य, वस्तू, व्यक्ती, घटना इ. - असलेल्या गोष्टींत जेव्हां विशेष रुचि उत्पन्न होते त्यानुरूप असलेल्या बुद्धीच्या अवस्थेला सुखबुद्धि म्हणतात. ज्या वस्तुविशेष विषयी अरुचि वाटते ती दुःखबुद्धि. पंचविषय शब्द, स्पर्श, रूप रस, गंध यांच्यात उत्पन्न होणारी रुचि वा आसक्ति ही सुख-दुःखाला कारणभूत म्हटली जाते. पुण्य तसेच पापकृत कर्म करीत राहाणारा आत्मा जेव्हां हें प्राप्त झालेले शरीर अप्राप्त असल्यासारखें मानतो, तेव्हां तो (अंश) आत्मा शरीराची उपाधी असलेला 'जीव' म्हटला जातो.

मन आदिश्च प्राणादिश्च इच्छादिश्च सत्त्वादिश्च पुण्यादिश्च एते पञ्चवर्गा इति एतेषां पञ्चवर्गाणां धर्मीभूतात्मा 
ज्ञानादृते न विनश्यत् इआत्मसन्निधौ नित्यत्वेन प्रतीयमान आत्मोपाधिः यः तल्लिङ्गशरीरं हृद्ग्रन्थिरित्युच्यते ॥ ७ ॥

मनादि अंतःकरण चतुष्टय, पंचप्राण व त्याचे उपप्राण, इच्छा-द्वेषरूपी वृत्ती, सत्त्व-रज-तमादि गुण, आणि पाप-पुण्य असें देहधर्माचें पांच वर्ग आहेत. शरीर-स्थित जीवात्म्याने हें पंचवर्ग धारण केल्यामुळे तो स्व-ज्ञान रहित होतो. अशा स्थितीत त्याला मुक्ति मिळणे कठीण ( अशक्यच म्हणाना ) आहे. अंतःकरणातील मन, चित्त ही सूक्ष्म तत्त्वें जीवात्म्याला जेव्हां सदोदित चिकटून असल्यासारखे भासतात तेव्हां त्याला लिंग-शरीर म्हणतात. हा भावच खरें तर हृदय-ग्रंथी ( अथवा गांठ ) होय. वस्तुतः जीवात्म्याला स्वरूप विस्मृतीमुळें ह्या हृदय-ग्रंथीची कल्पानाही नसते . म्हणूनच शांतिरूप आत्मतत्त्वाचा तो नेहमी इतरत्रच शोध घेत असतो. विशेषत्वानें असे पाहाण्यांत येते कीं, मुक्तीसाठी म्हणजेच ह्या हृदय-ग्रंथीचा पीळ सोडवण्यासाठी उपनिषदादि अनेक ग्रंथांतून 'चित्त-वृत्ति निरोधा'चा उपाय सांगितला असला तरी तें न करतां जीवाचा परत शांतीसाठी इतरत्रच शोध चालू असतो. प्रत्यक्षात श्रृति-स्मृति सूत्रांचा उपयोग आपण करतो तो बुद्धीगम्य रसग्रहणरूपी appreciation आनंद मिळविणे एव्हढ्या साठीच, असे दिसून येते.

तत्र यत्प्रकाशते चैतन्यं स क्षेत्रज्ञ इत्युच्यते ॥ ८ ॥

त्या लिंग शरीरात जे चैतन्य आहे, ज्यायोगे हें शरीर व त्याचे सर्व कारभार प्रकाशित ( प्रकट ) होतात त्याला क्षेत्रज्ञ म्हटलें आहे. शरीरांतर्गत मन-चित्त यांना शक्ति मिळते ती प्राणापासून. ह्या प्राणशक्तिचा आधार बनून हा क्षेत्रज्ञ हृदयाकाशांत अंगुष्ठमात्र रूपानें अवस्थित असतो असे म्हणतात.

ज्ञातृ ज्ञान ज्ञेयानाम् आविर्भाव तिरोभावज्ञाता स्वयम् आविर्भाव तिरोभावरहितः स्वयंज्योतिः साक्षीत्युच्यते ॥ ९ ॥

हा क्षेत्रज्ञ ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्यांची उत्पत्ति व लय निश्चितपणे जाणतो. पण तो स्वतः अक्रीय असून तटस्थपणें सर्व व्यापार शांतपणे पाहात असतो. म्हणून त्याला साक्षी म्हटले आहे.

ब्रह्मादिपिपीलिकापर्यन्तं सर्व प्राणि बुद्धिषु अवशिष्टतय उपलभ्यमानः सर्वप्राणि-बुद्धिस्थो यदा तदा कूटस्थ इत्युच्यते ॥ १० ॥

साक्षीरूप , क्षेत्रज्ञ वगैरे विशेषणें आत्म्याचा संबंध जेव्हां शरीर, जीवात्मा वगैरेचे वर्णन असतें तेव्हां संबोधिली जातात असे दिसते. अर्थात स्थूल शरीराचा नाश झाल्यावरही तो तर असतोच. शरीर नाशानंतरही जीवात्मा ज्या कांही वासनामय इ. शरीरानें वावरत असून त्याचे संस्कार, संचित कर्म वगैरे जे कांही त्याच्या बुद्धीत असते तिथेही `आत्म्या'चें अस्तित्व असतेंच. त्याला कूटस्थ म्हणतात. असा हा कूटस्थ आत्मा ब्रह्मापासून थेट मुंगीपर्यंत सर्व भूतमात्रांमध्ये त्यांच्या बुद्धींत वास करणारा असून त्यांचे स्थूल शरीर नाश पावल्यानंतरही त्या त्या जीवात्म्यात अवशिष्ट असतो.

कूटस्थः अपहितभेदानां स्वरूपलाभहेतुर्भूत्वा मणिगणे सूत्रमिव 
सर्वक्षेत्रेषु अनुस्यूतत्वेन यदा काश्यते आत्मा तदान्तर्यामीत्युच्यते ॥ ११ ॥

मण्यांच्या माळेंत सर्वाधारानें जसा धागा असतो, तदवत् आत्मा जीवात्म्यांच्यात त्यांना स्वरूपाची प्राप्ती व्हावी ह्या हेतूने विराजमान असलेला, सर्व प्राणीमात्रांत जसा पेरल्यासारखा भासतो, त्याला अंतर्यामी म्हणतात. क्षेत्रज्ञ, साक्षी, कूटस्थ, अंतर्यामी हीं सर्व जीवात्म्याच्या निरनिराळ्या अवस्थांती रुपांची नांवे होत.

सत्यं ज्ञानमनन्तमानन्दं सर्वोपाधिविनिर्मुक्तं कटकमुकुटादि उपाधिरहित सुवर्णघनवद् विज्ञान चिन्मात्रस्वभावात्मा यदा भासते तदा त्वं पदार्थः प्रत्यगात्मा इति उच्यते । सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । सत्यमविनाशि । अविनाशि नाम देशकालवस्तु निमित्तेषु विनश्यत्सु यन्न विनश्यति तदविनाशि । ज्ञानं नाम उत्पत्ति विनाशरहितं नैरन्तर्यं चैतन्यं ज्ञानमित्युच्यते । अनन्तं नाम मृद्विकारेषु मृदिव स्वर्णविकारेषु स्वर्णमिव तन्तुविकारेषु तन्तुरिव अव्यक्तादि सृष्टिप्रपञ्चेषु पूर्णं व्यापकं चैतन्यम् अनन्तमित्युच्यते । आनन्दं नाम सुखचैतन्यस्वरूपो अपरिमितानन्द समुद्रो अवशिष्टसुखस्वरूपश्च आनन्द इत्युच्यते ॥ १२ ॥

८ ते ११ मंत्रात आत्म्याला जीवात्म्याच्या संबंधात जी नांवे दिली गेली आहेत, ती सर्व त्या आत्म्याला लावलेल्या उपाधी होत. इतरत्र आत्म्याचे वर्णन करतांना त्याला सत्य, ज्ञान, अनंत, आनंद ही नांवे ( उपाधीच की ) देऊन त्याचे वर्णन केले जातें. खरेतर हे सर्व वाग्जाळ आहे. आत्मा वस्तुतः वर्णनातीत आहे. म्हणजे प्रत्यक्षात त्याला कसलीच उपाधी लावता येत नाही. अंशरूपी जीवात्म्याचेही तसेंच आहे. अशा ह्या जीवात्म्याला आणखी एक संबोधन लावले आहे. त्याचे नांव आहे 'त्वं' पद. अर्थात हें 'त्वं' पदही ज्ञानमय व चैतन्यमय आहेच. पण स्पष्टिकरणासाठी सुवर्णाचे उदाहरण घेऊन जीवात्म्याचे रूप दाखविण्याचा एक प्रयत्न ह्या मंत्रात केलेला आहे. म्हणतात की घनरूप सुवर्णच केवळ उपाधी लावल्याने जसे सुवर्णाचे कडे, सुवर्णमुकुट इ. रूपाने भासते तदवत् चैतन्यघन आत्मा त्वं पदाने भासमान होतो.
आता ब्रह्म ( आत्मा ) यांच्या सत्य, ज्ञान, अनंत इ. ज्या उपाधी आहेत त्यांची व्याख्या केली आहे. सत्य म्हणजे अविनाशी. देश, काळ, वस्तु यांच्या निमित्ताने लोप पावल्यासारखे भासले तरी जे तत्त्व नाश पावत नाही ते अविनाशी आणि तेच सत्य. उत्पत्ति व विनाश यांच्या पलिकडचे असे जे नित्य भासमान होणारें चैतन्य तत्त्व - त्याला म्हणतात ज्ञान. कारण-रूपानें जें समस्त सृष्टींत आणि पूर्णपणाने जे सदा व्याप्त असते त्याला म्हणायचे अनंत. जसे मडक्यांत मृत्तीक रूपाने, दागिन्यांत सुवर्ण रूपाने व सर्व वस्त्रांत धागा रूपाने. जे अपरिमित आणि निरामय सुख स्थितीचा अनुभव करवितें तें आनंद. ब्रह्म आनंदरूप म्हणून त्याल 'आनंद' ही म्हणतात.

एतद्वस्तुचतुष्टयं यस्य लक्षणं देशकाल वस्तु निमित्तेषु आव्यभिचारी तत्पदार्थः परमात्मेत्युच्यते ॥ १३ ॥

मागील मंत्रात वर्णन केलेल्या जीवात्म्यामध्ये स्थित असलेल्या आत्म्याची ( ब्रह्माची ) जी चार लक्ष्णें सांगितली गेली आहेत, अशा चारही लक्षणांनी युक्त ज्याचा निर्देश केला आहे ती सद्‍वस्तु वा ब्रह्मवस्तु यांत देशकालादि निमित्ताने कधीही परिवर्तन होत नाही. सर्व जीवात्म्यामध्ये माळेतील धाग्याप्रमाणे व्याप्त आत्मा त्या सर्वांहून 'पर' असल्यामुळे त्याला परमात्मा म्हणतात आणि अशा वस्तुलाही एक संबोधन आहे - त्याला म्हणतात 'तत्' पदार्थ.

त्वं पदार्थाद् औपाधिकात् तत् पदार्थाद् औपाधिक भेदाद् विलक्षणम् 
आकाशवत् सूक्ष्मं केवलं सत्तामात्र स्वभावं परं ब्रह्म इति उच्यते । १४ ॥

आतांपर्यंत ब्रह्मवस्तूचे जीवात्म्यामध्यें स्थित म्हणून 'त्वं' व त्याहूनही पर अवस्थेत म्हणून 'तत्' ह्या उपाधींच्या रूपानें त्याचे वर्णन झाले. पण ह्या उपाधींच्याही वेगळा असा तो आकाशाप्रमाणे सूक्ष्म आणि केवळ सत्तामात्र स्वभावाचा असल्यामुळें त्याला परब्रह्म असेंही म्हणतात. खरें तर ८ ते १४ यां मंत्रांत ज्याचा निर्देश केला गेला आहे ते सर्व एकच आहे, पण कुठलाही शब्द वापरला आणि कितीही मंत्रांद्वारे व्याख्या केली तरी तें सर्व निर्देशात्मकच राहाणार आहे. कारण 'ते' नेमके काय आहे हे 'सांगणेच' मूळात अशक्य नाही का ?

माया नाम अनादिः अन्तवती प्रमाणाप्रमाणसाधारणा न सती नासती न सदसती स्वयमधिका 
विकाररहिता निरूप्यमाणा सतीतरलक्षणशून्या सा माया इति उच्यते । अज्ञानं तुच्छाप्यसती कालत्रयेऽपि 
पामराणां वास्तवी च सत्त्वबुद्धिः लौकिकानाम् इदम् इत्थम् इति अनिर्वचनीया वक्तुं न शक्यते ॥ १५ ॥

ह्या मंत्रात परमेश्वराच्या अनंत शक्तिंपैकी त्याच्या 'माया' नामक शक्तीच्या व्याख्येचा प्रयत्न आहे.
जी अनादि ( जन्म व उत्पत्तिरहित ) आहे, जिचा कधीही नाश होत नाही, जी सत् ही नाही वा असत् ही नाही, जी सर्वत्र सदा परिवर्तन घडवीत असूनही स्वतः कधीही विकार पावत नसल्यासारखी भासते, जिचे अमुक लक्षणांनी युक्त म्हणून वर्णन करता येत नाही म्हणून लक्षणशून्य - अशा त्या शक्तिला 'माया' असे म्हणतात. ही मायाशक्ति तुच्छ, अज्ञानस्वरूप व मिथ्या आहे. पण मूढ मनुष्याला ही तिन्ही काळीं अगदी सत्यप्रत आणि वास्तविक अशीच भासत असते. त्यामुळे निश्चितपणें ती " अशा तशा प्रकारची आहे " असें तिच्या रूपाचे वर्णन करणे अशक्य कोटीतले आहे.
उपनिषदाच्या सुरुवातीला प्रश्न निर्माण करून व त्यांचे सूत्ररूपाने स्पष्टीकरण झाल्यावर आत्मबोध झालेला साधक आपला आनंद पुढील सहा मंत्रात व्यक्त करीत आहे.

नाहं भवाम्यहं देवो नेन्द्रियाणि दशैव तु ।
न बुद्धिर्न मनः शश्वन् न अहङ्कारः तथैव च ॥ १६ ॥
अप्राणो हि अमनाः शुभ्रो बुद्ध्यादीनां हि सर्वदा ।
साक्ष्यहं सर्वदा नित्यः चिन्मात्रोऽहं न संशयः ॥ १७ ॥
नाहं कर्ता नैव भोक्ता प्रकृतेः साक्षिरूपकः ।
मत्सान्निध्यात् प्रवर्तन्ते देहाद्या अजडा इव ॥ १८ ॥
स्थाणुर्नित्यः सदानन्दः शुद्धो ज्ञानमयोऽमलः ।
आत्माहं सर्वभूतानां विभुः साक्षी न संशयः ॥ १९ ॥

माझा कधी जन्म ( अर्थात् मृत्युही ) होत नाही. मीच ब्रह्म आहे. मी इंद्रिय नव्हे; मी मन, बुद्धी, चित्त वा अहंकारही नव्हे; मी सर्वदा मन व प्राण यांच्या शिवायही शुद्धस्वरूप आहे. मी बुद्धिच्या अभावातही सदा साक्षी असतो, तसेच सदैव चैतन्यमय असतो ह्यांत कांहीच संशय नाही. मी कर्ताही नाही व भोक्ताही नाही, केवळ प्रकृतीच्या व्यापाराचा तटस्थ साक्षी आहे. माझ्या सांन्निध्यामुळें सर्व देहधारी प्राणीमात्र सचेतन असल्यासारखे व्यवहार करतात. मी स्थैर्य, नित्य, आनंद व ज्ञान यांनी युक्त असलेला, विशुद्धस्वरूपामध्ये स्थित असलेला, निर्मळ आत्मा आहे. मीच सर्व प्राणीमात्रांमध्ये साक्षी रूपाने सर्वव्यापी आहे ह्यांत तिळमात्रही शंका नाही. १६-१९.

ब्रह्मैवाहं सर्ववेदान्तवेद्यं नाहं वेद्यं व्योमवातादिरूपम् ।
रूपं नाहं नाम नाहं न कर्म ब्रह्मैवाहं सच्चिदानन्दरूपम् ॥ २० ॥

वेदान्तासहीत सर्व शास्त्रांनी ज्या परम तत्त्वाचे वर्णन केले आहे तो ब्रह्म मीच आहे. माझें आकाश, वायु इ. नामांनी वर्णन करणे शक्य नाही. मी नाम, रूप, कर्म ह्यांतले कांहीच नसून मी सत्-चित्-आनंदस्वरूप आहे.

नाहं देहो जन्ममृत्यु कुतो मे नाहं प्राणः क्षुत्पिपासे कुतो मे ।
नाहं चेतः शोकमोहौ कुतो मे नाहं कर्ता बन्धमोक्षौ कुतो म इत्युपनिषत् ॥ २१ ॥

मी म्हणजे हे मर्यादित शरीर नव्हे. मग मला जन्म-मरण कुठचें ? मी म्हणजे प्राण नव्हे, मग मला तहान-भूक कशी असणार ? मी म्हणजे मन नव्हे, मग मला मोह-शोक कसे होणार ? मी कर्ताच नाही तर मला मुक्ति कशापासून ? आणि बंधन कशाचे ? [ कैवल्य उप. २०-२३ इथें देखील वरीलप्रमाणेच मुक्त जीवात्म्याने केलेले अत्यंत भावपूर्ण असे वर्णन आढळते.]
असे आहे हें सर्वसार-उपनिषदांतील ब्रह्माचें रहस्य.

ॐ सह नाववतु ॥ सह नौ भुनक्तु ॥ सह वीर्यं करवावहै ॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥