Monday, 2 December 2013

ब्रह्मसूत्र अर्थात् उत्तर मीमांसा - प्रस्तावना

ब्रह्मसूत्र अर्थात् उत्तर मीमांसा - प्रस्तावना


ब्रह्मसूत्र - प्राथमिक परिचय


भारतीय वाङ्मयात ’ब्रह्मसूत्र’ अथवा ’वेदांतदर्श’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. नामांतराने हा शारीरक दर्शन पूर्णप्रज्ञ दर्शन अशा नावांनीही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे वैदिक धर्माचा अवलंब करणार्याद सर्वच सांप्रदायांमध्ये हा ग्रंथ मान्यवर आहे. श्रीवेदव्यास महर्षिंनी याची रचना केली. काही विद्वानांच्या मते दोन व्यास होऊन गेले, कृष्णद्वैपायन व्याव व बादरायण व्यास. दोन्ही व्यासांच्या नावे हा ग्रंथ मानणारा एकेक वर्ग आहे. पण पुराणांच्या मते एकाच व्यक्तीची ही दोन नावे होत. म्हणून परंपरेनुसार श्रीकृष्ण व्यासच ब्रह्मसूत्राचे रचयिता मानले जातात. 

रचयिता कोणी का असेना ! ग्रंथाची महत्ता त्याचे अभ्यासक किती व कोण आहेत यावरून कळून येतेच. ब्रह्मसूत्रावर रामानुज, वल्लभ, निम्बार्क, मध्वाचार्य अशा मान्यवर वैष्णवांचे भाष्य आहे. चैतन्यमहाप्रभू सांप्रदायाचे बलदेव विद्याभूषण, रामानंद सांप्रदायातील प्रसिद्ध भाष्य आहे आनंदभाष्य टीका, शैव पंथातील श्रीकण्ठभाष्य, श्रीकरभाष्य प्रसिद्ध आहे. शंकराचार्यांच्या शारीरक भाष्यावर तर त्यांच्याच सुमारे ५० अनुयायांनीही टीका लिहिल्या आहेत. तसेच कित्येकांच्या भाष्यावरही प्रतिटीका केल्या गेल्या आहेत. 

ग्रंथशैली व स्वरूप :

ग्रंथाचा विषय आहे अद्वितीय ब्रह्मतत्त्वाचे निरूपण. अगदी मोजक्या शब्दात सूत्ररुपाने ब्रह्मसूत्रे ग्रथित केली आहेत आणि त्यांतून श्रुतिंच्या तात्पर्याचा निर्णय केला गेला आहे. पद्मपुराणांत ’सूत्र’ व्याख्या करणारा एक श्लोक आहे - अल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम् । अस्तोभ अनवद्यंच सूत्रं सूत्रविदो विदुः ॥ - विद्वानांच्या मते ज्यात अगदी थोडक्या शब्दात वर्णन, ज्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, ज्यात पूर्वापार मतांचे योग्य परिक्षण केले आहे, जे निर्दोष वादातीत आहे, अशा शब्द रचनेला सूत्र म्हणतात. 

शांकरमतानुसार ग्रंथात एकून ५५५ सूत्रे आहेत आणि त्यात १९१ विषयांचा अधिकरण रूपाने चर्चा आहे. (काही आचार्यांच्या मते अधिकरणांची संख्या भिन्न आहे). सर्व सूत्रे प्रत्येकी चार पाद याप्रमाणे चार अध्यायात विभागली आहेत. पहिला अध्याय आहे - समन्वय अध्याय. ज्यात ब्रह्मतत्त्वाचे स्पष्ट वर्णन आहे अशा सर्व श्रुति या अध्यायात एकत्रित आहेत, दुसर्या् अध्यायाचे नांव आहे - अविरोध - उपनिषदांतील अशा श्रुति ज्यांत परस्पर विरोध असल्यासारखे वाटते त्यासंबंधींची चर्चा येथे आढळते. या अध्यायात असे दाखवून दिले आहे की वस्तुतः त्यात परस्पर विरोध नाही. तिसरा आहे - साधन अध्याय - ज्यात ब्रह्मज्ञान प्राप्तीचे श्रुतिप्रतिपादित साधनांचे वर्णन आहे. आणि शेवटचा वा चवथा अध्याय आहे - फलाध्याय. यात साधनाच्या फलाचे स्वरूप - अर्थात् मोक्ष, जीवन्मुक्ति, विदेहमुक्ति आदि संबंधी श्रुतिंवर चर्चा आढळते. 

ब्रह्मसूत्रात ज्या वस्तूचे वर्णन आहे ते म्हणजे ’ब्रह्म’ हे ग्रंथाच्या नावावरूनच सुस्पष्ट आहे. ब्रह्म म्हणजे निरतिशय बृहद् म्हणजेच विशाल. ज्याचे निर्देशक लहान मोठ्या मापात सामावणे अशक्य अथवा आंत-बाहेर अशा परिच्छिन्न भेदाने असणे अशक्य. तसेच कालगणना, कोटी वर्षे इत्यादिने कालानुसारही त्याला परिच्छिन्न करणे अशक्य म्हणून निरतिशय बृहद्. वेगळ्या शब्दात म्हणायचे तर स्वतः परिपूर्ण, देश-काल मापाने अपरिच्छिन्न ’ब्रह्म’ ब्रह्मसूत्राचा विषय आहे.



No comments:

Post a Comment